तापलेल्या राजकीय वातावरणाला दहशतवादाची फोडणी
सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप चार महिन्यांचा कालावधी असला, तरी पाकिस्तानातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यात दंग झालेले तीन प्रमुख पक्ष - पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ), पाकिस्तानी पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ - तसेच दहशतवादी संघटनांना पाकिस्तानात मिळणारा आश्रय यांवरून विचारवंतांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, असे चित्र आज दिसत आहे.
"मुलाकडून पगार घेतला नाही, हाच काय तो माझा दोष?" अशी आर्त हाक देत पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सभांचा धडाका लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पद सोडावे लागले, याची सल त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळेच "माझे तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. कोट्यवधी लोकांनी मला पंतप्रधान म्हणून निवडून दिले. मग मला बडतर्फ करणारे ते पाच जण (सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती) कोण?" असा सवाल करीत शरीफ आपल्याला बळीचा बकरा बनविण्यात आले, अशी हाकाटी पिटत फिरत आहेत. मला पुन्हा सत्ता द्या, मग मतदारांचा अनादर करण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही, असा बचाव करीत त्यांनी दणक्यात प्रचार सुरू केला आहे. त्यांचे प्रचारातील मुद्देही नेहमीचेच आहेत. आपल्याला परिचित असलेलेच आहेत. "पाकिस्तानची प्रतिमा चांगली नाही म्हणूनच आपल्यावर ड्रोनने हल्ले होत आहेत. चार वर्षांत मी महागाई आणि दहशतवाद संपविला. एकही ड्रोन हल्ला होऊ दिला नाही. माझ्या बडतर्फीचा निकाल जनता मान्य करणार नाही. ते त्याला मतपेटीतूनच उत्तर देतील."
'नवा पाकिस्तान' उभारण्यासाठी मला मत द्या, अशी भूमिका आता त्यांनी घेतली आहे. 'नवा भारत' आणि 'नवी अमेरिका' आपण आधी ऐकली असल्यामुळे शरीफ कोणत्या मार्गावरून जाऊ इच्छितात याचा अंदाज येतो. अर्थात, त्यांचा मार्ग खडतरच असेल. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (नवाझ) अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी याचिकाही दाखल झाली आहे. त्यांच्या बडतर्फीचा काळ किती असावा, यावरही सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय देऊ शकते. फैसलाबादसारख्या मागास भागात शरीफना चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, पेशावरमध्ये त्यांची कसोटी लागणार आहे. अंतर्गत गटबाजीने त्यांचा पक्ष तिथे पोखरलेला आहे. पख्तुन समुदायाचे प्राबल्य असलेल्या या भागात त्यांच्या पक्षाची प्रतिमा फारशी चांगली नाही. वीज आणि इंधनाची टंचाई असताना शरीफ यांनी आपल्यासाठी काही केले नाही, अशी तेथील लोकांची भावना आहे.
संकटात असलेल्या शरीफ यांच्या समर्थनार्थ कन्या मरियम मैदानात उतरल्या आहेत. शरीफ यांचा काटा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनीच पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना याचिका करायला लावली, असा आरोप करीत त्या वडिलांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरीफ यांनाही आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, याचा अंदाज आहे. त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांचे धाकटे बंधू शाहबाझ यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, हे शाहबाझ काही धुतल्या तांदळाचे आहेत, असे नाही. लाहोरमधील आपल्या घराजवळ अनधिकृत रस्ता बांधल्याप्रकरणी त्यांना नुकतीच नोटीस बजाविण्यात आली आहे. भावी राजकारणाची ही नांदी म्हणायला हवी.
शरीफ यांचे मुख्य स्पर्धक पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो आणि त्यांचे 'कलंकित' पिता आसिफ अली झरदारी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आजोबा झुल्फिकार अली भुट्टो आणि आई बेनझीर भुट्टो यांनी ठरवून दिलेल्या भारतद्वेषाच्या राजकारणातून बाहेर पडायला बिलावल तयार नाहीत. त्यांच्या मते भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांतील जनतेला शांतता हवी आहे. पण भारत आणि इतर देशांनी पाकिस्तानवर आपली मते लादू नये, असे त्यांनी 'इंडिया टुडे' टीव्हीशी बोलताना सांगितले. भारत फक्त सहकार्य करण्याचा मोठ-मोठ्या गोष्टी करतो पण प्रत्यक्ष पाऊल काहीच उचलत नाही, हा हेका मात्र त्यांनी कायम ठेवला आहे.
पंजाब हा भुट्टो परिवाराचा एकेकाळी बालेकिल्ला होता. झुल्फिकार अली आणि बेनझीर यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टी तिथे वाढविली. बिलाल मात्र त्यांची पुनरावृत्ती करू शकतील का, याबद्दल जाणकारांना शंका आहे. बेनझीर यांच्या थडग्याजवळ त्यांचे वर्णन इंग्रजीत लिहिलेले आहे. ते असे: मुस्लिम जगातील पहिल्या पंतप्रधान. त्यांनी लोकशाही आणि इस्लामचा शांततेचा संदेश यांसाठी प्राणांची आहुती दिली. पक्षाचे अध्यक्ष या नात्याने बिलावल कोणती आहुती देतात, हे लवकरच कळेल.
पाकिस्तानला १९९२ मध्ये क्रिकेटचा विश्वचषक जिंकून दिल्यानंतर इम्रान खान नेता म्हणून उदयास आले. त्यांचा पक्ष तिसरी आघाडी म्हणून रूप घेऊ पाहत आहे. 'लाडला' या टोपण नावाने परिचित असलेले इम्रान शरीफ यांनाच आपला मुख्य शत्रू मानतात. काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी शरीफ पुढील महिन्यात दोषी ठरतील, असे भाकीत त्यांनी केले आहे. शरीफ आणि झरदारी हे दोघेही "लुटारू" आहेत. त्यांनी लुटलेला पैसा पुन्हा पाकिस्तानात आणू आणि तो शिक्षणावर खर्च करू, असे आश्वासन ते आपल्या सभांमधून देत आहेत.
मे मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदार शरीफ आणि भुट्टो यांच्या घराणेशाहीला कौल देतात की इम्रान खानसारख्या तुलनेने नवख्या खेळाडूला, हे पाहणे मनोरंजक ठरेल. अनिवासी पाकिस्तानी सुमारे २० बिलियन डॉलर दरवर्षी पाकिस्तानात पाठवीत असतात. त्यांनाही मतदानाचा अधिकार असावा, यासाठी इम्रान खान आग्रही आहे. निवडणूक मतदान यंत्राद्वारे घ्यावी, असाही मतप्रवाह आहे. मात्र, पुरेसा वेळ नसल्याने या निवडणुकीत तरी मतदानयंत्रे नसतील, असे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
अफगाणिस्तानवरून कोंडी
अमेरिकेने आधी तीन बिलियन डॉलरची संरक्षण मदत थांबवून पाकिस्तानला हिसका दिला होता. त्यात आता पाकिस्तानच्या अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमेवर ड्रोनद्वारे हल्ले करून दहशतवाद्यांची शिबिरे उद्ध्वस्त केल्याने पाकिस्तानी राज्यकर्ते पुन्हा एकदा हादरले आहेत. अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त केली ती शरणार्थींची शिबिरे होती, दहशतवाद्यांचे अड्डे नाही, असा दावा पाकिस्तानने केला खरा पण अमेरिकेने तो खोटा ठरविला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहीद अब्बासी यांनी अमेरिकेचा अफगाणिस्तानात जाणारा मार्ग बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानमध्ये लष्करी कारवाईसाठी लागणारी शस्त्रे अमेरिका पाकिस्तानच्या जमीन आणि हवाई हद्दीतूनच नेत असतो. चर्चेच्या माध्यमातून अफगाणिस्तानचा प्रश्न सोडविणे हाच मार्ग आहे. नाहीतर अमेरिकेला तिथे व्हिएतनामसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा अब्बासी यांनी दिला आहे.
अफगाणिस्तानातील तालिबानी ही पाकिस्तानची दुखरी नस आहे, हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. अफगाणी तालिबान्यांना मदत करणे, त्यांना आश्रय देणे यांत पाकिस्तानचे भले नाही, असे तेथील जाणकार उघडपणे बोलू लागले आहेत. प्रख्यात पाकिस्तानी धुरीण निजमुद्दीन शेख यांच्या मते पाकिस्तानने तालिबानी नेत्यांची काळजी करण्यापेक्षा अफगाणिस्तानात शांतता कशी नांदेल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
अमेरिकेखालोखाल अफगाणिस्तानला सर्वाधिक आर्थिक बळ भारताकडून मिळते. हिंदी सिनेमामुळे अफगाणिस्तानात भारताबद्दल प्रेम आणि आत्मीयता आहे. भारताला अफगाणिस्तानापासून दूर ठेवले नाही, तर बलुचिस्तानमध्ये कोंडी होईल, असे काही पाकिस्तानी धुरिणांना वाटते. त्यामुळे का होईना अमेरिकेला सहकार्य करा, अमेरिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन अशी सहकार्याची फळी उभारून भारताला लांब ठेवा, असा सल्ला त्यांनी त्यांच्या सरकारला दिला आहे. मोठ्या प्रमाणावर गरिबी असूनदेखील महासत्ता म्हणून भारताचा उदय होतो आहे, पश्चिमी देशांना भुरळ पाडण्यात भारत यशस्वी झाला आहे, याकडे पाकिस्तानी विचारवंतांनी तेथील राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. हिंदू राष्ट्रवादाचा झपाट्याने होत असलेला प्रसार पाहता भारताला हाताळणे आता सोपे राहिले नाही, याचेही दाखले ते देत आहेत.
'जमात-उद-दवा' ही दहशतवादी संघटना आणि तिचा म्होरक्या हाफीज सईद पाकिस्तानच्या गळ्यातील लोढणे असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. त्यांच्यावरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची समिती पाकिस्तानात गेली होती. सईद याने त्याचवेळी लाहोरच्या न्यायालयातून अटकपूर्व जमीन मंजूर करवून घेतला. दहशतवादी संघटनांवरील बंदीबाबत पाकिस्तान गंभीर नाही, असे चित्र त्यातून उभे राहिले. त्यामुळे आपण दहशतवादी संघटनांच्या विरोधात कारवाई करतो आहोत, हा पाकिस्तानचा दावा कोणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही, असे तेथील संरक्षकविषयक तज्ज्ञ मुहम्मद अमीर राणा यांनी म्हटले आहे.
'जमात-उद-दवा'चे सुमारे पाच हजार सदस्य दहशतवादाचा मार्ग सोडून सामाजिक कार्यकर्ते बनले आहेत, असा दावा अब्बासी यांनी इस्लामाबाद पोलिसांच्या एका कार्यक्रमात केला. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत पण त्यांचा दावा खरा मानला तरी 'जमात-उद-दवा'चे उर्वरित ४५,००० सदस्य अजूनही दहशतवादीच आहेत, ते त्यातून अधोरेखित होते. दहशतवादी संघटनांवर कायमचा उपाय शोधण्यासाठी सरकार आणि लष्कराने एकत्र येऊन मार्ग काढावा. त्याआधी त्यांच्या मुसक्या आवळण्यासंदर्भात संसदेत व्यापक चर्चा करावी, अशी सूचना राणा यांनी केली आहे. ती अर्थातच अंमलात येणार नाही, याची खात्री त्यांनाही असावी.
This is a platform for an open discussion on every aspect of the life. Your views are most welcome for a healthy discussion and moving a step ahead in empowerment of India.
Comments
Post a Comment